Steve Waugh, Varanasi Ganga: ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्टीव्ह वॉ याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. फोटोमध्ये स्टीव्ह वॉ बनारसच्या पवित्र गंगा नदीत अस्थी विसर्जित करताना दिसतोय. हिंदू चालरिती, रूढी आणि परंपरा यांना मानणारा खूप मोठा वर्ग भारताबाहेरही आहे. अनेक परदेशी खेळाडू, सेलिब्रिटी पहिल्यांदा भारतात आले की पुढे कायम येत जात राहतात. भारतातील संस्कृतीचा हेवा वाटतो असं अनेक परदेशी पर्यटक सांगतात. स्टीव्ह वॉ मात्र पर्यटनासाठी न येता त्याच्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आला होता. पण या फोटोचा Shane Warne याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे हा फोटो नक्की कधीचा फोटो, त्याबद्दल जाणून घेऊया.
फोटो नक्की केव्हाचा आहे?
स्टीव्ह वॉचा बोटीतून नदीत अस्थि विसर्जन करत असतानाचा एक फोटो व्हायरल झालाय. तो फोटो २०१७ सालचा आहे. तो त्याच्या काही साथीदारांसह बनारसला आला होता, त्यावेळी त्याने हिंदू रितीरिवाजांनुसार आपला मित्र ब्रायन याच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्या होत्या. चित्रात ब्राह्मणांसमवेत तो घाटावर बोटीत उभा राहून गंगेत अस्थींचे विसर्जन करताना दिसला. स्टीव्ह वॉ चा मित्र ब्रायन हा मोची होता. त्याच्या कुटुंबात कोणीही नव्हतं. सिडनीच्या ब्रायनची शेवटची इच्छा होती की त्याच्या अस्थी बनारस येथील गंगेत हिंदू विधींनुसार विसर्जित करण्यात याव्यात. हे वचन पूर्ण करण्यासाठी वॉ भारतात आला होता. तेव्हाचा हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
स्टीव्ह वॉ अनेक धर्मादाय संस्थांशी संबंधित आहेत आणि सामाजिक कार्यातही सक्रीय आहे. माझ्या हातून पुण्यकर्म घडावं अशी इच्छा होती. ब्रायनच्या अस्थि गंगेत विसर्जित व्हाव्यात अशी त्याची इच्छा होती, ती मी पूर्ण केली. आता मला समाधान वाटलं, अशी प्रतिक्रिया स्टीव्ह वॉ याने त्यावेळी दिली होती.