सीतामढी – बिहारच्या सीतामढीमध्ये पार्लेजी बिस्किट(Parle-G)बाबत एक अफवा वेगाने परिसरात पसरली आहे. त्यामुळे या परिसरातील दुकानाबाहेर पार्लेजी बिस्कीट घेण्यासाठी लोकांची तुफान गर्दी जमली आहे. सीतामढीत जितिया पर्वाशी निगडीत अफवा पसरली आहे. घरात जितकी मुलं आहेत त्या सर्वांनी पार्लेजी बिस्किट खावं अन्यथा त्यांच्यासोबत काहीतरी अघटित घटना घडू शकते असं वाऱ्याच्या वेगाने अफवा पसरली आहे.
जितिया पर्वात मुलाच्या दिर्घ, आरोग्य आणि सुखी आयुष्यासाठी आईकडून व्रत ठेवलं जातं. मात्र ही अफवा पसरल्यापासून परिसरातील दुकानाबाहेर पार्ले जी बिस्किट खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. या अफवेची भीती लोकांच्या मनात इतकी रुजली आहे की, परिसरातील दुकानांमधील पार्ले जी बिस्किटाचा स्टॉक संपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजही लोक या अफवेवर विश्वास ठेवत आहेत. सीतामढी जिल्ह्यातील बैरगनिया, ढेंग, नानपूर, डुमरा, बाजपट्टी, मेजरगंजसह अनेक भागात ही अफवा पसरली आहे.
सर्वजण पार्ले जी बिस्किट खाताना दिसून येत आहेत
ही अफवा कधी व कुठून पसरली हे कुणालाही माहिती नाही. परंतु या अफवेमुळे पार्ले जी बिस्किटच्या विक्रीत वेगाने वाढ झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत लोकं पार्ले जी बिस्किट खरेदी करताना आढळले. जेव्हा लोकांना विचारण्यात आले की, पार्ले जी बिस्किट खरेदी करण्यासाठी इतकी गर्दी का केलीय? तेव्हा कळालं की, पार्ले जी बिस्किट न खाल्ल्याने काहीतरी अघटित घटना घडू शकते. त्यामुळे पार्ले जी बिस्किट खरेदी करून मुलांना खाण्यास दिलं जात आहे. सर्व लोक पार्ले जी बिस्किट मागत असल्याने दुकानाबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांत पार्ले जी बिस्किटाची मागणी प्रचंड वाढली आहे. प्रत्येकजण पार्ले जी बिस्किट द्या असं म्हणत आहे. त्यामुळे दुकानात पार्ले जी बिस्किटचा स्टॉक संपला आहे. देशातील सर्वात मोठा बिस्कीट ब्रँड म्हणून Parle G प्रसिद्ध आहे. त्यात अशा अफवेमुळे सीतामढी जिल्ह्यात बिस्किटाची मागणी प्रचंड वाढल्यानं या अफवेचा कंपनीला नक्कीच फायदा झाला आहे.