Student built Bridge of Chairs for Teacher: पावसाळा हा जसा मोठ्यांचा आवडता ऋतु आहे, तसाच चिमुरड्यांचाही लाडका ऋतु आहे. त्याचं कारण म्हणजे, पावसाळ्यात काही वेळा शाळांना अनपेक्षित सुट्टी मिळते. थोडा जास्त पाऊस कोसळला की शाळांना लगेच सुट्टी मिळते आणि चिमुकल्यांना दिवसभर खेळायची संधी मिळते. पण नुकताच एक असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात मुलं शाळेत असताना त्यावेळी पावसाचे पाणी शाळेत गुडघ्यापर्यंत भरले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूसाठी एक वेगळीच शक्कल लढवल्याचे दिसले.
शाळेतील मुलांनी आपल्या शिक्षकासाठी पाण्यात खुर्च्या ठेवून पूल बनवल्याची घटना मथुरेत समोर आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकासाठी केलेल्या या कृत्याचे चांगलेच कौतुक होताना दिसत आहे. पण काही लोक मात्र या कृतीला अयोग्य ठरवतानाही दिसत आहेत. हे प्रकरण बलदेव परिसरातील दाघेटा ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळेचे आहे. पावसामुळे शाळेत पाणी भरले होते त्यामुळे शाळेला सुटी देण्यात आली. शाळा बंद होत असताना शाळेच्या सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या पल्लवी शाळेतून वेगळ्याच पद्धतीने बाहेर निघाल्या. शाळेतून बाहेर निघण्यासाठी शिक्षिकेने घाण पाण्यातून मार्ग काढला. त्यासाठी मुलांनी खुर्च्यांचा एक पूल बनवला आणि त्यावर पाय ठेवून शिक्षिका बाहेर निघाल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शाळेतील तुंबलेल्या पाण्यामध्ये खुर्च्यांचा पूल करून शिक्षकाला बाहेर निघण्यास मदत केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोक या व्हिडिओबाबत संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसले. काही जणांनी मुलांचा शिक्षिकेप्रति असलेला आदरअधोरेखित केला तर काहींनी ही शिक्षिका मुलांच्या भवितव्याशी खेळणारी असल्याचे म्हणत शाळेतील शिक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.