उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हरदोई येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेचा मुलांकडून मसाज करून घेतानाचा (Video Of Student Massaging Teacher) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर आता त्या शिक्षिकेला बडतर्फ करण्यात आलं आहे. हरदोईमधील पोखरी प्राथमिक विद्यालयात हा प्रकार घडला.
उर्मिला सिंह या त्या शाळेत सहशिक्षिका म्हणून काम करतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्या एका खुर्चीत बसलेल्या दिसतात. वर्गातच इतर मुलांसमोर एक विद्यार्थी त्या शिक्षिकेच्या हाताला मसाज करताना व्हिडिओत दिसत आहे. ग्रेडिंग न्यूजच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘शिक्षिका विद्यार्थ्यांकडून बायसेप मसाज घेताना..’ यूपीतील हरदोईमधील व्हायरल व्हिडिओ.’ अशा ओळी व्हिडिओसोबत दिल्या आहेत.
दरम्यान, “हा व्हिडिओ सोशल मीडियावरूनच आम्हाला मिळाला. प्रथमदर्शनी शिक्षिका दोषी आढळल्या आहेत. त्यांच्यावर बडतर्फीची (Teacher Suspended) कारवाई सुरु करण्यात आली आहे,” असं हरदोईमधील बेसिक शिक्षण अधिकारी बी. पी. सिंह यांनी 'इंडिया टुडे'ला सांगितलं.
व्हिडिओ अपलोड झाल्यापासून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मुलांकडून काम करून घेताहेत. यांच्यासारख्यांमुळेच सरकारी शाळा बदनाम होत आहेत. यांना नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे.” असं एकानं लिहिलं आहे. तर “व्हॉट अ शेम” अशी प्रतिक्रिया दुसऱ्यानं दिली आहे.