गडग : कर्नाटक राज्यातील गडग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण इथे एका सरकारी शाळेतील विद्यार्थी उशिरा शाळेत पोहचल्याने त्यांना चक्क शौचालय साफ करावे लागत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाळेतील कूक विजयलक्ष्मी चलावडी यांनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला होता. नागवी, गडग येथील शासकीय प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील ही घटना असल्याचे उघड झाले आहे.
शौचालय साफ करण्याची दिली शिक्षा शाळेतील प्रशासनाने विद्यार्थी वेळेवर शाळेत न आल्याने त्यांना शौचालय साफ करण्यास लावले असा आरोप विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केला. शिक्षण विभाग घटनेची कसून चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शाळेतील कूक विजयलक्ष्मी यांनी सांगितले, "जेव्हा मी शाळेत होतो, तेव्हा विद्यार्थ्यांनी शौचालय साफ करण्यासाठी माझ्याकडून झाडू आणि बादली मागितली. विद्यार्थ्यीं म्हणत होते की असे करायला शिक्षकांनी सांगितले आहे. तेव्हा मला वाटले की हे बरोबर नाही म्हणून मी याचा व्हिडीओ काढला आणि व्हॉट्सॲपवर शेअर केला."
व्हिडीओ व्हायरल होताच दिले चौकशीचे आदेशदरम्यान, विद्यार्थी शौचालय साफ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच कूकला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रागाचा सामना करावा लागला. ही व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्स चांगलेच संतापले असून शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तर ही एक सरकारी शाळा असल्यामुळे अशी घटना घडली असल्याचे काहींचे म्हणणे आहे.