सिडनी: मागील दोन-तीन वर्षांमध्ये कोरोनाच्या महासाथीमुळे अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. काही लोक तर अद्याप नोकरीच्या शोधात असून, बेरोजगारीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये याच्याविरूद्ध स्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण इथे सफाई कर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार असूनही कामगारांनी काम करण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेशिवाय कामगारांना प्रत्येक आठवड्यात दोन दिवस सुट्टी मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
डेली टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सफाई कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. कारण तिथे कोणीच सफाई कर्मचारी म्हणून काम करण्यास तयार होत नाही आहे. याच कारणामुळे देशातील एका मोठ्या कंपनीने ही अनोखी ऑफर देऊन कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही निष्फळ ठरला. कंपनीने आठवड्यातून दोन दिवस सुट्टी व्यतिरिक्त आणखी काही विशेष सुविधा देणार असल्याचे सांगितले आहे. सिडनीतील ॲब्सोल्यूट डोमेस्टिक (Absolute Domestics) या कंपनीने अनेक पॅकेजेस जाहीर केले आहेत. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर कोणाला येथे काम करायचे असेल तर त्याला ७२ लाख ते १ कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल. दिवसातून फक्त ८ तास काम करावे लागेल तसेच आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळेल.
या प्रकरणाबाबत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले की, सफाई कर्मचाऱ्याला नोकरी देण्यापूर्वी त्याची मुलाखत घेतली जाईल. यानंतर त्याला जॉब ऑफर केला जाईल. तसेच जर कोणत्या कर्मचाऱ्याने ओव्हर टाइम शिफ्ट केली तर त्याला प्रत्येक तासाला ३,६०० रूपयांची रक्कम दिली जाईल.
विशेष म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने विविध प्रकारच्या जाहीरातींचे पोस्टर लावले आहेत. ठिकठिकाणी जाहिराती लावल्या तरी कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या ऑफरकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र एवढा पगार असतानाही कर्मचारी याकडे का पाठ फिरवत आहेत अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.