आज ऑनलाईन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरीचा व्यवसाय खूप मोठा झाला आहे. अल्पावधीतच घरपोच अन्न पोहोचवण्याची सुविधा लोकांना फार आवडते. आपल्याला त्यासाठी फार कष्ट करण्याची गरज नाही. पण कोणी ना कोणी यासाठी कठोर परिश्रम करत असतं, जसे की रेस्टॉरंटचे कर्मचारी किंवा फूड डिलिव्हरी करणारी लोक. परिस्थिती कोणतीही असो ते आपल्याला काम करताना दिसतात.
एका स्विगी डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुसळधार पावसात तो ग्राहकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी धडपडत आहे. डिलिव्हरी बॉय आपल्या बाईकवर भर पावसात भिजत असलेलं व्हिडीओमध्ये पाहायला आहे. अंकुश शर्मा नावाच्या एका युजरने हा व्हि़डीओ शेअर केला आहे. "हे दृश्य हृदयद्रावक आहे. मी वचन देतो की आजपासून माझ्यापर्यंत फूड डिलिव्हरी करणाऱ्या प्रत्येक रायडरला मी २० रुपये टीप देईन" असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर एक कॅप्शन देण्यात आलं आहे. जे सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतं आहे. "पाऊस प्रत्येकासाठी रोमँटिक नसतो" असं म्हटलं आहे. एका युजरने कंपन्यांनी किंमती वाढवून या लोकांना चांगला पगार द्यावा असा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्याने अन्न कोणत्या परिस्थितीत आपल्यापर्यंत पोहोचतं ते पाहा असं म्हटलं आहे.
डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ आणि त्यावरील कॅप्शन सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. याआधीही फूड डिलिव्हरी बॉयचे असे अनेक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आले असून ते जोरदार व्हायरल झाले आहेत.