चेन्नई: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील नोकरी सोडलेल्या श्रीनिवासन जयरामन यांनी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून काम सुरू केलं. टीसीएसमधील नोकरी सोडल्यानंतर पुढील कंपनीत रूजू होण्याआधी जयरामन यांच्याकडे आठवडा होता. या आठवड्यात काहीतरी नवं आणि वेगळं करावं यासाठी त्यांनी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवताना डिलिव्हरी एजंट्ससमोर येणाऱ्या आव्हानांचा अनुभव जयरामन यांनी घेतला. तो अनुभव जयरामन यांनी लिंक्डइनवर शेअर केला आहे. झोमॅटोमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी एजंट्सना अडचणी त्यांनी शेअर केल्या आहेत.
बरेचसे ग्राहक त्यांचं नेमकं लोकेशन देत नाहीत किंवा त्यांचा फोन नंबर अपडेट करत नाहीत, असं जयरामन यांनी सांगितलं. तुम्ही परिसरात नवे असल्यास रेस्टॉरंट शोधण्यात अडचणी येतात. गुगल मॅप्सचा आधार घेऊनही रेस्टॉरंट्सचा पत्ता लगेच सापडत नाही.
काहीवेळा रेस्टॉरंट आणि ग्राहक यांच्यातलं अंतर खूप जास्त असतं. एकदा मला १४ किलोमीटर दूर जाऊन ऑर्डर पोहोचवावी लागली होती, असा अनुभव त्यांनी शेअर केला. कधीकधी ३ तासांत केवळ तीनच ऑर्डर मिळतात. पेट्रोलचे दर दररोज वाढत आहेत. त्यामुळेही बराच त्रास होतो, असं जयरामन यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
डिलिव्हरी एजंटचं काम अतिशय सोपं असल्याचं आपल्याला वाटतं. काहींना तर ते काम अपमानास्पद वाटतं. झोमॅटोमध्ये डिलिव्हरी एजंटचं काम करणार असल्याचं सांगताच माझ्या कुटुंबानं विरोध केला होता. तुमचं तुमच्या कामावर प्रेम असेल तर तुम्हाला कधीच ते अपमानास्पद वाटणार नाही. जे लोक हे काम करतात, त्यांना मी सलाम करतो, असं जयरामन म्हणाले.