आग्रा - उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यातील एका शाळेच्या क्लासरूममध्ये शिक्षिकांनी ठुमके लावत केलेल्या डान्सची सध्या जोरदार चर्चा आहे. या शिक्षिकांनी एकापाठोपाठ एक अनेक फिल्मी गाण्यांवर जोरदार डान्स केला. आता या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच शिक्षण विभागाने या व्हिडीओची दखल घेतली आहे. बीएसएने दोन शिक्षिकांना याबाबत नोटिस बजावली आहे. आता दोन दिवसांच्या आत याबाबतचं उत्तर शिक्षिकांना द्यावं लागेल. शिक्षिकांनी केलेल्या या कृतीमुळे विभागाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची प्रतिक्रिया बीएसए ब्रजराज सिंह यांनी व्यक्त केली. (Teachers make Dance in classroom, dance video goes viral )
अछनेरा ब्लॉकमधील प्राथमिक विद्यालयामध्ये बुधवारी शिक्षिकांनी एक पार्टी केली. या पार्टीमध्ये शाळेतील सहाय्यक शिक्षिका जीविका कुमारी आणि रश्मी सिसौदिया यांनी फिल्मी गाण्यावर डान्स केला. या शिक्षिकांनी सलमान खानच्या जो मैनू यार ना मिला तो मर जावा आणि गजबन पानी ले चाली या हरियाणवी गाण्यावर डान्स केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवरून लोक सोशल मिडियावर शिक्षण विभागाला ट्रोल करत आहेत.
सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक स्तर घसरत आहे. मुलांना शिकवण्याऔवजी शिक्षक मौजमजा करत आहेत. उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हामंत्री ब्रजेश दीक्षित यांनी सांगितले की, या प्रकारचे कृत्य शिक्षण विभागासाठी निंदनीय आहे. अछनेरा येथील शिक्षणाधिकारी अमरेश कुमार यांनी सांगितले की, शिक्षिकांचा डान्स करतानाचा १६ आणि ५ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कार्यपद्धतीमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा धुळीस मिळत आहे. दोन्ही शिक्षिकांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. या व्हिडीओंची तपासणी केल्यावर कारवाई केली जाईल, असे बीएसए ब्रजराज सिंह यांनी सांगितले.