Tennis Players Fight Video: स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल यांसारख्या टेनिस जगतातील दिग्गज खेळाडूंनी हा खेळ सर्वोत्तम बनवला आहे. या खेळाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने नुकतीच निवृत्ती घेतली, तेव्हाही सर्व दिग्गज त्याच्यासाठी अश्रू ढाळताना दिसले. पण आता असे प्रकरणही समोर आले आहे, ज्यामुळे खेळाला गालबोल लागले आहे. टेनिस कोर्टवरच दोन खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. त्यांच्यात खूप शिवीगाळही झाली. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ऑर्लिन्स चॅलेंजर स्पर्धेत घडला प्रकार
ओपन डी'ऑर्लिअन्स चॅलेंजर स्पर्धेदरम्यान सुपर-१६ फेरीच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. ही स्पर्धा फ्रान्समध्ये खेळवली जात आहे. या लढतीत बल्गेरियाचा एड्रियन अँड्रीव आणि फ्रान्सचा कोरेन्टिन माउटेट आमनेसामने होते. या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. सामना अतिशय रोमांचक झाला. शेवटी, 247व्या मानांकित अँड्रीव्हने 64व्या मानांकित माउटेटचा 2-6, 7-6, 7-6 असा पराभव केला. या विजयासह अँड्रीव्हने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले. सामना जिंकल्यानंतर अँड्रीव आणि माउटेट एकमेकांशी हस्तांदोलन केले. पण त्यानंतरच एक विचित्र प्रकार घडला.
अंपायरला बचावासाठी यावे लागले
खेळाडूंनी हस्तांदोलन केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की गेली. नेटमधून बाहेर आल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली, हाणामारीही झाली. अखेर चेअर अंपायरला राडा थांबवण्यासाठी यावे लागले. अंपायरने दोघांना दूर केले आणि प्रकरण कसेबसे निवळले. पाहा व्हिडीओ-
दोन खेळाडूंमधील हा गैरवर्तनाचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर दोन पैकी एक खेळाडू असलेल्या माउटेटने लिहिले की, 'मॅचनंतर जे काही झाले त्याबद्दल मला माफी मागायची नाही. जेव्हा एखादा खेळाडू माझ्या डोळ्यात बघून मला दोनदा शिवीगाळ करतो तेव्हा त्याला माझ्या भाषेत समजावून सांगण्याशिवाय मी काहीही करू शकत नाही.' यावरून दोन्ही खेळाडूंमध्ये खूप शिवीगाळ झाली असावी, असे वाटते.