ऑस्ट्रेलिया कांगारुंप्रमाणेच सापांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. घनदाट जंगलं असल्यानं ऑस्ट्रेलियात सापांची संख्या जास्त आहे. जंगलांमध्ये असलेल्या रस्त्यांवरून साप अगदी सहज दृष्टीस पडतात. कधीकधी घरांमध्या साप शिरल्याच्या घटना घडतात. अशावेळी सर्पमित्रांना बोलावण्यात येतं. गोल्डकोस्टमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेनं नुकताच दोन सर्पमित्रांना फोन केला होता. घराच्या बाल्कनीत एक-दोन नव्हे, तर अनेक साप असल्याची माहिती तिनं सर्पमित्रांना दिली. त्यानंतर सर्पमित्र तिथे तातडीनं पोहोचले.
सर्पमित्र महिलेच्या घरी पोहोचले, त्यावेळी त्यांना चार साप एकमेकांमध्ये गुंतलेले दिसले. यातील तीन नर, तर एक मादी होती. तीन नर एका मादीसाठी आपापसात भिडल्याचं सर्पमित्रांच्या लक्षात आलं. मादीसाठी तीन नर भिडले. त्यात ते जखमी झाले. मात्र मादी कोणालाच मिळाली नाही.
वाईल्ड एन्काऊंटर्सनी या घटनेचा व्हिडीओ फेसबुक पेजवर शेअर केला आहे. दररोज अशा घटना पाहायला मिळत नाहीत, असं वाईल्ड एन्काऊंटर्सनी म्हटलं आहे. एक मादीसाठी सापांनी अशा प्रकारे संघर्ष केलेला आतापर्यंत कधीच पाहिलेला नाही. तीन सापांना वेगळं करताना त्यांना बरीच मेहनत करावी लागली.