कित्येक वेळा स्टाईल मारण्याच्या नादात काही जण अशी स्टंटबाजी करतात, की त्यांना आपण कायदा हातात घेत असल्याचंही भान उरत नाही. पण ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा स्टंटबाजांना धडा शिकवणं सोपं झालं आहे. कारण या घटनांची माहिती तात्काळ ट्विटरद्वारेपोलिसांपर्यंत पोहोचते. असाच काहीसा प्रकार ठाणे परिसरात पाहायला मिळाला. काही तरुण चालत्या कारमधून बाहेर लटकत बॉलिवूड गाण्यांवर दंगा करत होते. यावेळी एका प्रवाशाने त्यांचा व्हिडीओ शूट केला आणि ट्विटरवरुन मुंबई पोलिसांकडे तक्रार केली.
आदिल शेख नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला. मुंबई पोलिसांना टॅग करत त्याने लिहिलं आहे, की “हा व्हिडिओ जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर मुंब्रा-कोसा परिसरातील आहे. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया त्यांच्यावर त्वरित कारवाई करा” आदिलने या व्हिडीओसह पत्ता आणि वाहन क्रमांकाची संपूर्ण माहिती दिली आहे. मुंबई पोलीस अशा प्रकरणांमध्ये खूप सतर्क असतात. त्यांनी आदिलच्या ट्विटर हँडलला लगेच उत्तर दिले आणि लिहिले की “सर, तुमची तक्रार ठाणे शहर पोलिसांकडे पाठवण्यात आली आहे” तक्रारदार आदिलने यावर प्रतिक्रिया देत दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की “सर, अशा लोकांमुळे खूप त्रास होतो. ही समस्या एका दिवसापुरती नाही. अशा लोकांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे”
या व्हिडीओला आतापर्यंत शेकड व्हिव्ज मिळाल आहेत. मुंबई पोलीस ट्विटरवर खूप सक्रिय असतात. कोणतीही तक्रार आल्यास मुंबई पोलिस त्यावर तत्काळ कारवाई करतात. युझरला ते प्रतिसाद देतात, की आपली तक्रार संबंधित ठिकाणी कारवाईसाठी घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे व्हिडीओ आणि ट्विटही अनेकदा व्हायरल होताना दिसतात.