आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. परंतू, एका दुकानदाराने उधारी बंद करण्यासाठी एक अट घालून पाटी लावली आहे. ती वाचून लोकांनीदेखील उधारी मागणे बंद केले आहेत.
मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधील कर्बला चौकातील किराणा मालाच्या दुकानात अशी पाटी लागली आहे. याद्वारे दुकानदाराने उधारीपासून मुक्ती मिळविली आहे. मोहम्मद हुसैन नावाच्या दुकानदाराचे हे डेली नीड्स नावाचे दुकान आहे. त्याने वैतागून १ जानेवारी, २०२३ पासून उधारी बंद केली होती. परंतू त्याचे ग्राहक सारखे त्याच्यामागे उधारी मागत होते. यामुळे हा दुकानदार आणखी त्रस्त झाला होता.
यामुळे दुकानदाराने उधारी पुन्हा सुरु करण्यासाठी अट टाकली आहे. ही अट शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे. जोपर्यंत राहुल गांधी पतप्रधान बनत नाहीत तोवर उधारी बंद राहणार आहे, असे त्याने दुकानातील काचेवर चिकटवले आहे. मोहम्मद हुसैनने सांगितले की हे त्याचे वडिलोपार्जित दुकान आहे. इथे तीन ते चार हजार रुपये दररोजची विक्री होते. परंतू त्यातील २००० रुपयांच्या वस्तू या उधारीवरच नेल्या जातात. ही उधारी वसूलही होत नाही. परत माल आणण्यासाठी पैसे लागतात. यामुळे १ जानेवारीपासून उधारी देणे बंद केले आहे.
परंतू, लोकांना उधारी मागणे सुरुच ठेवले होते. प्रत्येकाला नाही नाही सांगून वैतागल्याने शेवटी असे पोस्टर लावले आहे. राहुल गांधी लवकरात लवकर पंतप्रधान व्हावेत. ते चांगले नेते आहेत. यामागे राहुल गांधी पंतप्रधान बनू शकत नाहीत, हा उद्देश नाहीय. सध्यातरी ते पंतप्रधान बनू शकत नाहीएत, म्हणून मी असे स्लोगन लावले आहे, असे तो म्हणाला. एनबीटीने याचे वृत्त दिले आहे.