गाडी बंद पडल्यानंतर तिला धक्का देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा महामंडळाची बसही बंद पडल्यानंतर तिला ८-१० माणसांच्या मदतीने धक्का देऊन सुरू केले जाते. मात्र, चक्क रेल्वेच बंद पडल्यानंतर तिला चक्क धक्का देऊन स्टार्ट करण्यात आल्याची घटना समोर आलीय. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटीझन्सने रेल्वे विभागाची खिल्ली उडवलीय. तसेच, मजेशीर कमेंटही या व्हायरल व्हिडिओवर करण्यात आल्या आहेत.
देशात बुलेट ट्रेन येणार असल्याचे स्वप्न देशवासीयांना दाखवले जात आहे. मात्र, एका ट्रॅकवर रेल्वे बंद पडल्यानंतर ट्रेनमधील प्रवासी, रेल्वेचा स्टाफ, जवान आणि पोलिसांची झालेली दमछाक सध्या चर्चेचा आणि चेष्ठेचा विषय बनला आहे. व्हायरल व्हिडिओत ट्रेनला धक्का देत सुरू करण्याचा प्रयत्न सर्वांकडून होत आहे. त्यामध्ये, प्रवाशांसह जवान, पोलीस आणि रेल्वेचा स्टाफ लांबलचक ट्रेनला धक्का देत आहेत. त्यावेळी, धक्का दिल्यानंतर थोड्या प्रमाणात रेल्वे पुढे-मागे होते आणि काही वेळातच ट्रेन सुरू झाल्याचेही दिसते.
ट्रेन सुरू झाल्याचा आनंद धक्का मारणाऱ्या सर्वांनाच झाल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येते. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर मजेशीर कमेंट करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर नेटीझन्स मजाही घेत आहेत. तर, बुलेट ट्रेनची स्वप्न पाहणाऱ्या देशात अशी परिस्थिती असल्याचे सांगत सरकारला लक्ष्यही केलं जातंय. दरम्यान, हा व्हिडिओ कुठल्या मार्गावरील आणि कधीचा आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.