Viral Video : जसजशी दिवाळी जवळ येते तसतशी सोशल मीडियावर एका खास मिठाईची चर्चा अधिक बघायला मिळते. ती मिठाई म्हणजे सोन पापडी. दिवाळीदरम्यान सगळ्यात जास्त गिफ्ट दिली जाणारी ही मिठाई आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच या मिठाईची चर्चा होत असते. तसेच लोक भेसळयुक्त खव्यापासून वाचण्यासाठी सुद्धा या मिठाईची निवड करतात.
सोन पापडी ही मिठाई लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. पण ही मिठाई कशी बनवतात, हे तुम्हाला माहीत नसेल. अशात सोन पापडी बनवण्याच्या प्रक्रियेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक्सवर @avijeet_writes नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'दिवाळीतील सगळ्यात आवडती मिठाई आणि प्रत्येक ऑफिसमध्ये गिफ्ट दिली जाणारी मिठाई'.
व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, सगळ्यात आधी मैदा आणि बेसन चांगल्याप्रकारे मिक्स करून हलक्या आसेवर भाजला जातो. त्यानंतर ४ ते ५ लोक या भाजलेल्या गोष्टी चांगल्या मिक्स करतात. नंतर हे मिश्रण एका स्ट्रेमध्ये फेटलं जातं. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे तुकडे केले जातात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी मिठाई तयार करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थिती केले आहेत. तर काही म्हणाले की, स्वच्छतेची योग्य काळजी घेतली गेली नाही. तर काही म्हणाले की, यात फार काही अडचण नाही.
एकाने कमेंट केली की, "या मिठाईची एक मोठी खासियत म्हणजे ही एकमेकांना फॉरवर्ड केली जाते. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता मी बाहेरची मिठाई खाणं बंद केलं आहे". दुसऱ्याने लिहिलं की, "कदाचित याच कारणाने ही मिठाई नातेवाईकांमध्ये सगळ्यात जास्त गिफ्ट केली जाते".