माणुसकीचे दर्शन! चिमुकलीच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी जमवले तब्बल १८ कोटी रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 04:29 PM2022-07-12T16:29:19+5:302022-07-12T17:25:23+5:30
केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात असलेल्या एका गावात स्पायनल मस्कुलर ॲट्रोफी या आजाराने ग्रस्त असलेल्या ९ महिन्यांच्या सिया फातिमाच्या उपचारासाठी तब्बल १८ कोटींची रक्कम जमा केली आहे.
नवी दिल्ली ।
जगात माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नाही असं म्हटलं जातं. अनेक लोक या धर्माचे पालन करण्यासाठी आपल्या जीवाचीही बाजी लावतात. याचाच प्रत्यय देणारी घटना केरळमध्ये घडली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण केरळ मधील एका गावातील लोकांनी एका चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी आर्थिक मदत जमा केली आहे. कोट्यवधी रूपये जमा करुन गावकऱ्यांनी चिमुकलीचा जीव वाचवला आहे.
माहितीनुसार, केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात असलेल्या एका गावात स्पायनल मस्कुलर ॲट्रोफी (SMA)या आजाराने ग्रस्त असलेल्या ९ महिन्यांच्या सिया फातिमाच्या उपचारासाठी तब्बल १८ कोटींची रक्कम जमा केली आहे. दुर्मिळ आजाराची औषधं अमेरिकेहून मागवावी लागत होती आणि याच्या एका डोसची किंमत १८ कोटी रूपये आहे. जोल्जेन्स्मा एक जीन थेरपी औषध आहे याचा एक डोस आजारावर तत्काळ नियंत्रण मिळवू शकते. सियाद आणि फजिला यांची मुलगी सिया हिला जन्म घेताच तीन महिन्यानंतर चालताना त्रास जाणवू लागला. चिमुकलीला मालाबार ऑफ मेडिकल साइंसेज (MIMS)येथे दाखल करण्यात आले जिथे डॉक्टरांनी तिला स्पाइनल मस्कुलर ॲट्रोफी (SMA)ग्रस्त असल्याचे सांगितले. बंगळुरू आणि तिरुअनंतपुरममधील चाचणीनंतर समजले की चिमुकली टाइप १ 'एसएमए'ने ग्रस्त होती.
सरकारनं करायला हवं ते गावानं करुन दाखवलं
सियाचे वडील सियाद यांनी सांगितले की, चिमुकलीला डोकं वर करताना त्रास होत आहे आणि तिला खाताना किंवा स्तनपान करताना देखील त्रास जाणवत आहे. विशेष म्हणजे कोझिकोड जिल्ह्यातील चोरोड गावातील लोकांनी सोमवारी एका सभागृहात एक मोठी परिषद आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये पैसे गोळा करण्यात आले. दरम्यान या कृत्यामुळे गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून सियाच्या घरच्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.