गुजरातच्या अहमदाबादमधील एका महिला कॉन्स्टेबलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रविवारी, गुजरात उच्च न्यायालयाची शिपाई भरती परीक्षा देण्यासाठी एक आई आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन ओढव येथील परीक्षा केंद्रात पोहोचली. काही मिनिटांतच परीक्षा सुरू होणार होती. पण, तिचा सहा महिन्यांचा मुलगा जोरजोरात रडायला लागला. तिथेच ड्युटीवर असलेल्या दया बेन या पोलिस कॉन्स्टेबलने महिलेची गोंधळलेली अवस्था बघितली आणि लगेच तिच्याकडे धाव घेतली. परीक्षेचा वेळ वाया जातोय हे लक्षात आल्याने ‘तुम्ही परीक्षा द्या, मी बाळाला सांभाळते’, असे ती त्या महिलेला म्हणाली.
बाळाला कडेवर घेतले आणि त्याच्यासोबत खेळायला लागली. दया बेन यांनी परीक्षेची ड्युटी तर सांभाळलीच शिवाय परीक्षा संपेपर्यंत बाळाचीही काळजी घेतली. अहमदाबाद पोलिसांनी तिचे फोटो ट्विटरवर पोस्ट करत कौतुक केले. लगेचच फोटो व्हायरल झाले अन् नेटकरीही फिदा झाले. गुजरातच्या डीजीपींनीही तिचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला.