मुंबईच्या लोकल ट्रेनचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने सर्वांनाच थक्क केलं आहे. अनेकदा लोकल ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी वेगाने ट्रेनमध्ये चढतात आणि उतरतात, मात्र यावेळी छोटीशी चूक झाली तरी काहींना आपला जीव गमवावा लागतो. असंच काहीसं या घटनेतही पाहायला मिळालं, जेव्हा तीन मुली चालत्या ट्रेनमधून एकापाठोपाठ एक उतरू लागल्या. त्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज (Mumbai Local Train Incident Video) समोर आल्यावर लोक चक्रावून गेले.
मुंबईत चालत्या ट्रेनमधून पडलेल्या एका मुलीला सुदैवाने गार्डने काही सेकंदात वाचवलं. स्थानकावर तैनात असलेल्या होमगार्डला लगेचच या घटनेबद्दल कल्पना आली आणि तातडीने धाव घेत त्यांनी लोकल ट्रेनमधून पडलेल्या मुलीला ताबडतोब वाचवलं. चालत्या ट्रेनमधून खाली उतरताना पडलेल्या मुलीचे प्राण सतर्क होमगार्डमुळे वाचले.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, लोकल ट्रेन काही वेळ स्टेशनवर उभी राहिली आणि नंतर पुढच्या स्टेशनसाठी रवाना झाली. ट्रेनचा वेग जरा वाढताच एका मुलीने ट्रेनमधून उडी मारली (3 Girls Jumped from Local Train). तिचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्मच्या काठावर पडली. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या होमगार्डने तिला मदत करत चालत्या ट्रेनखाली जाण्यापासून वाचवलं. दरम्यान, यापाठोपाठ आणखी दोन मुली चालत्या ट्रेनमधून खाली उडी मारताना दिसल्या. एकामागून एक ट्रेनमधून उडी मारत त्यादेखील प्लॅटफॉर्मवर पडल्या.
मुंबईचे पोलीस आयुक्त (रेल्वे) कैसर खालिद यांनी या गार्डचा त्याच्या सतर्कतेबद्दल सत्कार केला. सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) जवान अल्ताफ शेख असं या गार्डचं नाव आहे. ट्विटमध्ये कैसर खालिद यांनी लिहिलं की, 'होमगार्ड अल्ताफ शेख यांनी 16/4/22 रोजी जोगेश्वरी स्टेशनवर उपनगरीय ट्रेनमध्ये चढताना पडलेल्या महिला प्रवाशाचा जीव वाचवला. त्यांच्या सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठेसाठी त्यांना पुरस्कृत केले जात आहे.'