London Luxury Heist: लंडनच्या बेलग्रेविया भागातील एक लक्झरी स्टोर सेलिअरमध्ये मास्क लावलेल्या तीन चोरांनी एक मोठी चोरी केली. चोरांनी सिमेंटच्या ब्लॉकच्या मदतीने स्टोरची खिडकी तोडली आणि 500,000 पाउंड म्हणजे भारतीय करन्सीनुसार साधारण ५.०९ कोटी रूपयांचे डिझायनर कपडे आणि हॅंडबॅग लांबवले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ज्यात दिसतं की, एक मोटारसायकल आणि एका ई-बाईकवर तीन चोर आले आणि चार मिनिटांमध्ये माल घेऊन पसार झाले.
या स्टोरच्या मालक हानुष्का टोनी यांनी द मेट्रोला सांगितलं की, "ही घटना आमच्या बिझनेसचं नुकसान करणारी आहे. आम्ही गेल्या पाच वर्षात अनेक आर्थिक अडचणीतून हे स्टोर उभं केलं. आता आमचं मोठं नुकसान झालं".
हानुष्काने स्टोरच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने सांगितलं की, "मला खरंच मोठा धक्का बसला. रात्री तीन लोकांनी आमचं लंडनमधील स्टोरवर चोरी केली. काचा फोडल्या. त्यांना जे काही सापडलं ते घेऊन गेले. पोलीस पाच मिनिटांनंतर आले. आता ते चोरांचा शोध घेत आहेत. ज्या वस्तू चोरी झाल्या त्याची त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल".
या चोरीमुळे स्टोरच्या मालक आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. सेलिअर एक प्रीमिअम फॅशन स्टोर आहे, जे लंडनच्या लक्झरी फॅशन जिल्हा बेलग्रेवियामध्ये आहे. ही घटना लंडनच्या मुख्य मार्केट भागात झाली आहे. या ठिकाणी अशा घटना सामान्यपणे कमीच होतात.