नवरात्रीची तयारी सध्या सगळीकडे जोरादार सुरू आहे. खासकरून पश्चिम बंगालमध्ये हा उत्सव अधिक जल्लोषात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अशात यूट्यूब आणि सोशल मीडियात एका डान्स व्हिडीओची चर्चा जोरदार रंगली आहे. दुर्गा पूजेचं गाणं असलेल्या या व्हिडीओची खासियत म्हणजे यात खासदार नुसरत जहां रूही आणि मिमि चक्रवर्ती डान्स करत आहेत. दोघीही तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार आहेत.
नूसरत जहां आणि मिमि चक्रवर्ती दोघीही खासदार झाल्यावर संसदेपासून ते गल्ली बोळांपर्यंत चर्चेचा विषय ठरल्या होत्या. नुसरत बशीरहाट येथून तर मिमि या जादवपूर येथून खासदार आहेत. हा व्हिडीओ लोखंडी सळ्या तयार करणाऱ्या एका कंपनीने तयार केला आहे.
१६ सप्टेंबरला हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत ९.६ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला तर फेसबुकवर १.५ मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. खासदार नुसरत जहां आणि मिमि चक्रवर्ती दोघाही बंगाली सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
या व्हिडीओमध्ये मिमि आणि नुसरत यांच्यासोबतच आणखी एक अभिनेत्री सुभाश्री गांगुली सुद्धा दिसत आहे. टीएमटी या कंपनीकडून हा व्हिडीओ तयार करण्यात आला असून हा व्हिडीओ उत्सवाच्या कॅम्पेनचा एक भाग आहे. आता देशातील दोन खासदारांचा डान्स व्हिडीओ समोर आला असेल तर चर्चा तर होणारच ना....