फक्त भारतातच नाही, तर जगभरात अनेक मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या आहे. या शहरांच्या यादीत अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचेही नाव येते. आता याच शहरातून एक चकीत करणारी घटना समोर आली आहे. शहरातील प्रचंड ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी एका भारतीय वंशाच्या तरुणीने वेगळाच जुगाड लावला. तिने विमानतळावर जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर बुक केले. सध्या या घटनेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशी सुरी नावाच्या तरुणीला मॅनहॅटनहून जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जायचे होते. तिला माहित होते की, रस्त्यात तिला प्रचंड ट्रॅफिक लागणार आहे, त्यामुळे तिने चक्क उबेरद्वारे (Uber) हेलिकॉप्टर राईडचा पर्याय निवडला. तुम्ही म्हणाल की, हा वेडेपणा आहे. पण खुशीने सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, तिला हेलिकॉप्टरसाठी जास्त पैसे खर्च करावे लागले नाही.
हेलिकॉप्टर आणि कॅबचे भाडे खुशीने एक्सवर उबेर कॅब आणि हेलिकॉप्टरच्या प्रवासाचा खर्च आणि वेळ यांची तुलना करणारा स्क्रीनशॉट टाकला आहे. या माहितीनुसार, उबेर कॅब राइडचे अंदाजे भाडे $131.99 (म्हणजे 11,023.47 रुपये) होते. पण, याद्वारे तिला विमानतळावर पोहोचण्यासाठी एक तास लागला असता. तर, मॅनहॅटन ते विमानतळापर्यंत हेलिकॉप्टरचे भाडे 165 डॉलर (13780.39 रुपये) होते. याद्वारे ती अवघ्या पाच मिनिटांत विमानतळावर पोहोचणार होती.
या दोघांच्या भाड्यात फारसा फरक नव्हता, त्यामुळेच खुशीने चक्क हेलिकॉप्टर बुक केले. खुशीच्या या पोस्टमुळे इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगली आहे. एवढ्या कमी किमतीत हेलिकॉप्टर राईडचा पर्यायही उपलब्ध आहे, हे पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत.