बंगळुरू : शहरात भाड्याने घर घेणे म्हणजे युद्ध लढण्यासारखे आहे. एखाद्याला घर मिळत नाही आणि मिळाले तरी घरमालकाच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. अशाच एका प्रकरणात एका व्यक्तीने आपली किडनी सेलवर टाकली आहे. यासंबंधी सोशल मीडियावर एक पोस्टर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये घरमालकाने व्यक्तीकडून सिक्योरिटी डिपॉजिटची मागणी केली आहे. त्यामुळे सिक्योरिटी डिपॉजिटचे पैसे जमवण्यासाठी त्या व्यक्तीने आपली किडनी विकायची तयारी केली आहे.
रमायख या ट्विटर युजर्सने पोस्टर शेअर केले आहे, ज्यावर लिहिले आहे, "लेफ्ट किडनी ऑन सेल." यासोबत पोस्टरवर छोट्या अक्षरात लिहिले आहे की, "घर मालक सिक्योरिटी डिपॉजिटची मागणी करत आहे, त्यासाठी पैशांची गरज आहे." याचबरोबर, पोस्टरमध्ये खाली स्पष्ट करण्यात आले आहे की, ही एक मस्करी आहे आणि त्या व्यक्तीने QR कोडद्वारे आपले प्रोफाइल देखील शेअर केले आहे. हे पोस्टर आता ट्विटरवर व्हायरल झाले आहे आणि मोठ्या संख्येने लोक ते शेअर करत आहेत.
दरम्यान, कर्नाटकातील बंगळुरू शहर घर भाड्याच्या बाबतीत खूप महाग होत आहे, जिथे घर भाड्याने घेण्यासाठी सिक्योरिटी डिपॉजिट भरणे बंधनकारक आहे आणि तीही मोठी रक्कम असते. अनिता राणे नावाच्या एका ट्विटर युजर्सने लिहिले की, "मी देखील हे 100% करू शकते आणि मार्केटिंग टेक्टिससाठी रिझल्ट मिळवू शकते." याचबरोबर, काही लोकांनी बंगळुरूमध्ये घर शोधण्याचे त्यांचे अनुभवही शेअर केले आहेत.