धूम्रपान सोडण्यासाठी एका व्यक्तीने आपलं डोकं पिंजऱ्यात बंद केल्याची अफवा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. परंतु या बातमीबद्दलचं सत्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. तुर्कीच्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून नव्हे तर स्वतःच्या इच्छेनुसार आपलं डोकं पिंजऱ्यात बंद केलं आहे. इब्राहिम यूकेल असं या व्यक्तीचं नाव आहे. धूम्रपान सोडण्यासाठी त्या व्यक्तीने स्वतःचं 'डोकं' एका धातूच्या पिंजऱ्यात कैद केलं आहे.
तुर्कीमधील Hürriyet Daily News या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राने इब्राहिमबद्दलची बातमी प्रथम प्रकाशित केली. रिपोर्टनुसार, इब्राहिमने दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या, सिगारेटची दोन पाकिटे ओढण्याच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी हा पिंजरा तयार केला होता. हेल्मेटपासून ही प्रेरणा घेतल्याचे मानले जात होते. ही घटना जुनी असून ती आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एका जवळच्या व्यक्तीचा लंग कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीने सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या पिंजऱ्याची चावी नातेवाईकांना दिली. यामध्ये इब्राहिमच्या पत्नीनेही त्याला चांगली साथ दिली. सोशल मीडियावर हा फोटो पुन्हा व्हायरल झाल्यावर नेटिझन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"