Twitter Elon Musk Blue Tick: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले. एका ट्विटमध्ये मस्क यांनी ट्विटरचे वर्णन 'मुक्तपणे विहार करणारा पक्षी' असे केले आहे. या डीलपूर्वी मस्क यांनी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात फेक अकाउंट्स असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ट्विटरने पूर्णपणे योग्य माहिती दिली तरच ते कंपनी खरेदी करतील, असेही त्यांनी सांगितले होते. आता मस्क स्वत:चे ट्विटरचे बिग बॉस झाल्यामुळे, ट्विटरवरील व्हेरिफाईड अकाऊंट्सची ब्ल्यू टिक काढली जाणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. नक्की काय आहे हा प्रकार अन् का रंगलीय अशी चर्चा... जाणून घ्या
एलॉन मस्क यांनी ट्विटरचा कार्यभार सांभाळल्यानंतर आता युजर्स मस्क यांच्याकडे एक अजब विनंती करताना दिसू लागले आहेत. सर्व प्रकारच्या व्हेरिफाइड युजर्सचे ट्विटरवरील ब्लू टिक काढून टाका, अशी मागणी युजर्स करताना दिसत आहेत. #Remove_all_BlueTicks हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे. अनेक युजर्स असे मानतात की व्हेरिफिकेशन प्रक्रिया पार करून ब्ल्यू टीक मिळालेले अनेक लोक हे त्यासाठी पात्र नाही. त्यामुळे ट्विटर वापरकर्त्यांना देखील ब्लू टिक्स मिळूच नयेत. #Remove_all_BlueTicks या हॅशटॅगने ट्विटरवर प्रतिक्रियांचा पूर आला. ट्विटर वापरकर्ते आता अशा लोकांचे प्रोफाइल शोधत आहेत आणि शेअर करत आहेत ज्यांच्या फॉलोअर्सचा आकडा दोन अंकीही नाही, तरीही त्यांचे अकाऊंट व्हेरिफाइड झाले आहे. दिलीप मंडल @profdilipmandal म्हणाले- ब्लू टिक आणि व्हेरिफिकेशनचा धंदा बंद करा. त्याचवेळी @CAChirag हँडलवरून चिराग चौहान म्हणाला की, 'ब्लू टिक फक्त अशा वापरकर्त्यांनाच दिली पाहिजे ज्यांचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.' चिराग म्हणतात की, अनेक अकाऊंट्स खरी नाहीत. तर, एका युजरने म्हटले की- व्हेरिफाइड आणि सामान्य असा भेदभाव काढून टाकल्यास एलॉन मस्क समानतेचे उदाहरण संपूर्ण जगापुढे ढेवू शकतील.
--
--
दरम्यान, ट्विटरचा कारभार हाती घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी ४ अधिकाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये भारतीय वंशाचे CEO पराग अग्रवाल, सर्वोच्च कायदे व्यवहार अधिकारी विजया गड्डे, सीएफओ नेड सेगल आणि जनरल काउंसिल सीन अगेट यांचा समावेश आहे. कंपनी आगामी काळात आणखीही घोषणा करू शकते अशी चर्चा आहे.