पटना – एका संतापलेल्या प्रियकराच्या शापामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार(CM Nitish Kumar) यांची खुर्ची जाईल? नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत? असं आम्ही नव्हे तर एक नाराज झालेला प्रियकराचं म्हणणं आहे. ज्याच्या गर्लफ्रेंडचं बिहारमध्ये लागलेल्या लॉकडाऊनदरम्यान लग्न झालं आहे. या प्रियकरानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे लॉकडाऊन काळात लग्नावर निर्बंध आणावेत अशी विनवणी केली होती. जी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली नाही. आता त्याने नाराज झालेल्या प्रियकरानं ट्विटरवरून तुम्हाला माझा शाप लागेल अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी बिहारमध्ये लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. नितीश कुमार यांनी ट्विट करून म्हटलं की, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बिहारमध्ये ५ मे २०२१ पासून ३ आठवड्यांचं लॉकडाऊन लावलं होतं. आज सहकारी मंत्र्यासोबत याविषयावर चर्चा केली. लॉकडाऊन लावल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचं चांगले परिणाम दिसले. त्यामुळे बिहारमधील लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे आता १ जून २०२१ पर्यंत लॉकडाऊन लागू असेल असं ते म्हणाले.
तुमचं अपयश लपवण्यासाठी हे सगळं करू नका
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घोषणेनंतर पंकज कुमार गुप्ता नावाच्या ट्विटर युजरने मुख्यमंत्र्यांना टॅग करत म्हटलं की, सर, तुमचं अपयश लपवण्यासाठी हे सगळं करू नका. तुम्हाला मी विनवणी केली होती, माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा. तुमच्याकडून एवढंही झालं नाही. तुम्हाला स्वत:ला मुख्यमंत्री म्हणताना लाज कशी वाटत नाही. आज माझ्या डोळ्यासमोर माझ्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झालं परंतु तुम्ही काहीच केले नाही असं त्याने म्हटलं.
तुम्ही बिनकामी मुख्यमंत्री, स्वत:च्या पदाचा राजीनामा द्यायला हवा
इतकचं नाही तर पंकजनं पुढे म्हटलंय की, सर, तुम्ही बिनकामी मुख्यमंत्री आहात. तुम्हाला तुमच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. १९ मेपासून मी तुम्हाला कित्येक वेळा मागणी केली होती. माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा. परंतु तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. फक्त बेरोजगारीमुळे माझं लग्न तिच्यासोबत झालं नाही. तुम्हाला माझा शाप लागेल असं संतापलेल्या प्रियकरानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राग काढला आहे.