गोड पदार्थ कोणाला आवडत नाहीत? पोटभर जेवल्यानंतर स्विट डिश मिळाली की काय स्वर्गानंदच म्हणावा. अशा परिस्थितीत बहुतेक लोक मिठाईच्या दुकानांकडे वळतात किंवा घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करतात. पण फूड डिलिव्हरी अॅपवर वाजवी किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त गोड पदार्थ पाहिल्यावर अनेकांनी आश्चर्यव्यक्त केलं आहे. एका व्यक्तीला झोमॅटो अॅपवरून गुलाबजाम मागवायचे होते तो ऑर्डर करायला गेला आणि अॅपवर अवघ्या गुलाबजामची किंमत ४०० रुपये इतकी दाखवली. रेट पाहून त्याला धक्काच बसला. मग काय त्यानं स्क्रीनशॉट घेतला आणि तो ट्विटरवर शेअर केला, जो व्हायरल आता झाला आहे. आता या पोस्टवर नेटिझन्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
ट्विटरवर भूपेंद्र नावाच्या युझरनं स्क्रीनशॉट शेअर केला आहे. "दोन गुलाब जामुनसाठी ४०० रुपये, गाजराचा हलवा ३,००० रुपये प्रति किलो. बरं तेही चक्क ८० टक्के सूटसह. हे इतके स्वस्त आहे यावर विश्वास बसत नाही. मी खरंच २०२३ मध्ये आहे ना?", असा टोला लगावत या यूझरनं झोमेटोला टॅग केलं आहे. भूपेंद्रच्या या ट्विटने सोशल मीडियावर केवळ फूड डिलिव्हरी अॅप्सवरच नव्हे तर इतर शॉपिंग वेबसाइट्सवरही कमालीच्या किमतींबद्दल नव्या वादाला तोंड फोडले आहे. ग्राहकांना फसवण्यासाठी कंपन्या सवलतीचे निमित्त देतात, असे लोकांचे म्हणणे आहे.
झोमेटोनं काय म्हटलं?झोमेटोनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. "भूपेंद्र…आम्हाला याची चौकशी करायला आवडेल. कृपया आमच्यासोबत DM द्वारे रेस्टॉरंटचे तपशील शेअर करा. आम्ही किमती निश्चित करण्यासाठी रेस्टॉरंटशी संपर्क साधू", अशी प्रतिक्रिया झोमेटोनं भुपेंद्र याला दिली आहे. असाच एक अनुभव शेअर करताना आणखी एका ट्विटर युजरनं त्याला झोमेटोवर १ हजार रुपयांची कोल्ड कॉफी पाहिली होती असं सांगितलं आहे.