जंगलात गेल्यावर वाघाचा आवाज कानावर पडताच भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. एक वाघ बघुन तुमची अशी हालत होत असेल तर दोन वाघ एकत्र आल्यावर काय होईल? मात्र, सध्या सोशल मिडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात दोन वाघ नुसते एकत्रच नाही आलेयत तर ते एकमेकांसोबत चांगलेच भिडलेयत...
हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. जंगलात दोन वाघांची झालेली ही लढाई कर्नाटक येथील नागरहोल नॅशनल पार्कमधील (Nagarhole National Park) आहे. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकानं ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. ट्विटरवर हा व्हिडिओ (Twitter Video) बी एस सुरन यांनी शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की दोन्ही वाघ एकमेकांवर हल्ला करत आहेत. सुरुवातीला ते एकमेकांच्या जवळ येतात आणि मग शत्रूच्या ताकतीचा अंदाज घेतात. यानंतर दोघंही एकमेकांवर हल्ला करायला सुरुवात करतात आणि आपल्या पंजाने एकमेकांना दुखापत करण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान वाघांचा आवाज घुमत असल्याचं ऐकू येतं.
वाघ हा एक टेरिटोरियल प्राणी आहे आणि आपल्या परिसरात इतर वाघांची उपस्थिती त्याला अजिबातही सहन होत नाही. याच कारणामुळे वाघ स्वतःच्या जीवाची बाजी लावत आपल्या परिसराचं रक्षण करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील दोन्ही वाघ मेल असल्याचं म्हटलं जात आहे. या लढाईदरम्यान एका वाघानं दुसऱ्याच्या खांद्यावर इतक्या जोरात पाय दिला, की समोरचा वाघ जोरात जमिनीवर कोसळला. मात्र, दोघांमधील कोणीही हार मानण्यास तयार नाही.