नाशिक - एका टोलनाक्यावर महिला प्रवासी आणि टोक नाक्यावरील कर्मचारी महिलेमध्ये वादावादी होऊन मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. टोलच्या रकमेवरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती असून, या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नाशिकमधील असल्याचे समोर आले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये दोन्ही महिला एकमेकींना धक्काबुक्की करताना आणि एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसत आहेत. मात्र तिथे असलेले लोक भांडण सोडवण्याऐवजी व्हिडीओ काढत असल्याचे दिसत आहे. तसेच या महिला एकमेकींना शिविगाळ करत असल्याचेही व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.
टोल नाक्यावर या महिलांमध्ये काही मिनिटे सुरू होती. त्यादरम्यान, काही लोकांनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकजण या मारहाणीचा व्हिडीओ काढताना दिसत होते. हे व्हि़डीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ ट्वीट करणाऱ्या एका व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, नाशिकमधील पिंपळगाव येथील टोल नाक्यावर दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यावर लोकांनीही भरपूर कमेंट्स करून आपली मतं मांडली. तसेच ही हाणामारी कशी अनावश्यक होती. तसेच ती कशी रोखता आली असती. हेही सांगितलं.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओला पाहून एका युझरने लिहिलं की, सर्वजण व्हिडीओ बनवत आहेत. मात्र भांडण सोडवण्याचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही आहे. आजकाल लोक भांडण सोडवण्याऐवजी व्हिडीओ बनवायला सुरुवात करतात. हे आवश्यक आहे का? मात्र असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. टोल नाक्यावरील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये टोलच्या पैशावरून नेहमीच वादावादी होत असते.