समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करताना, पाण्याच्या प्रवाहात लोक वाहून गेल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता घडली आहे. भयावह व्हिडीओ समोर आला असून तो इंग्लंडमधील आहे. यामध्ये काही लोक समुद्रकिनारी बांधलेल्या स्लोपवर उभं राहून आनंद घेत आहेत. स्लोपवर देखील जोरदार लाटा येत आहेत. त्यावर उभं राहून लोक एन्ज़ॉय करताना दिसत आहेत.
व्हिडीओ डेव्हन, युनायटेड किंगडम येथील आहे. यामध्ये एक मुलगी देखील इतर लोकांप्रमाणेच स्लोपवर उभी आहे. याच दरम्यान, एक जोरदार लाट येते आणि त्य़ात मुलगी वाहून गेली. तिने थोडावेळ आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण पाण्याच्या वेगापुढे ती काही करू शकत नाही आणि वाहून गेली. मुलीला वाचवण्यासाठी उपस्थित लोकांमध्ये गोंधळ उडाला.
एका व्यक्तीने आपला जीव धोक्यात टाकून मुलीचा जीव वाचवला. ही धोकादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत सहभागी लोकांना किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यातून धडा मिळाला आहे. नॉर्थ डेव्हॉन कौन्सिलने इशाऱ्यासह हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि लोकांना भरतीच्या प्रसंगी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
"समुद्राची परिस्थिती बदलणारी असू शकते, म्हणून कृपया किनाऱ्यावर नेहमी सावधगिरी बाळगा" असं म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल झाल्याने लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत. मुलगी वाहून गेली होती. तिचा जीव वाचणं अशक्य होतं. पण स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मुलीला वाचवलं त्याचे आभार असं एका युजरने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.