वॉशिंग्टन : कल्पना करा की मोठ्या मेहनतीने तुम्ही ७० हजार रुपयांयी रक्कम बचत केली. जेणेकरुन त्यातून तुमची एखादी गरज भागवता येईल. पण एखाद्या लहान मुलाने तुमच्या या ७० हजारांच्या नोटा फाडून फाडून त्याचे तुकडे केले तर तुम्हाला कसं वाटेल. काहीसं असंच अमेरिकेतील एका कपलसोबत झालं आहे. उटाह शहरातील एका कपलला चांगलाच धक्का बसला जेव्हा त्यांच्या २ वर्षाच्या मुलाने जवळपास ७५ हजार रुपयांच्या फाडून टाकल्या.
अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, बेन आणि जॅकी बेलनॅपने अनेक वर्ष हे पैसे जमा करुन ठेवलेले होते, जेणेकरुन ते फुटबॉल सामन्याची तिकीट विकत घेऊ शकतील. पण त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाने त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. त्याच्या हातात हे पैशांचं पाकिट लागलं आणि त्यांने हा गोंधळ घालून ठेवला.
त्याने पाकिटातून पैसे काढले आणि सर्व नोटा कटिंग मशीनने कापल्या. नोटांचे तुकडे तुकडे करुन टाकले. कपल म्हणाले की, साधारण १,०६० डॉलर (74 हजार रुपयांपेक्षा जास्त) जमा केले होते. पण काही मिनिटांमध्ये ही त्यांची जमापुंजी कचऱ्याच्या डब्यात गेली.
त्यांनी सांगितले की, 'जेव्हा आम्हाला हे कळाले तेव्हा ५ मिनिटे आम्हाला काही सुचलेच नाही. आम्ही शांत झालो होतो. आम्हाला काहीच कळत नव्हतं की, काय करावं. आम्ही केवळ पैशांच्या त्या तुकड्यांकडे बघत राहिलो. बेनने त्याचा मुलगा लिओचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला असून त्यासोबत नोटांच्या तुकड्यांचाही फोटो आहे.