अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एका समुद्री जीवाच्या पाठीवर ट्रम्प लिहिलेलं आढळून आलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर अमेरिकेतील फिश अॅन्ड वाइल्डलाइफ सर्व्हिसने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेतील वाइल्डलाइफ प्रोटेक्शन कायद्यानुसार हा समुद्री जीव फारच दुर्मिळ प्रजातीचा आहे.
सिट्रस काउंटी क्रॉनिकलने या घटनेचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओ बघू शकता की विशाल समुद्री जीवाच्या पाठीवर Trump असं लिहिलं आहे. जाड अक्षरात ते दिसून पडतं. पण हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही की, हे लिहिलंय कुणी. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या घटनेबाबत एरिझोना बेस्ड सेंटर फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटीने सांगितलं की, ते या घटनेची पूर्ण माहिती देणाऱ्याला ५ हजार डॉलर म्हणजे ३ लाख रूपये बक्षीस देतील. हे समुद्री जीव जास्तकरून शाकाहारी असतात. त्यांना त्यांच्या विशाल आकारासाठी आणि शांत स्वभावासाठी समुद्री गाय असंही म्हटलं जातं.
अमेरिकन फिश अॅन्ड वाइल्डलाईफ सर्व्हिसच्या प्रवक्त्याने सांगितले की, यात समुद्री जीवाला जखम झालेली नाही. अमेरिकन सरकार या जीवांच्या सुरक्षेबाबत फार अॅक्टिव आहे. गेल्या अनेक वर्षाापासून या जीवांची संख्या वाढलेली बघायला मिळत आहे. १९९१ मध्ये फ्लोरिडामध्ये या समुद्री जीवांची संख्या १२६७ होती ती आता वाढून ६३०० इतकी झाली आहे.
दरम्यान ही पहिलीच वेळ नाही ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव एखाद्या जीवाच्या शरीरावर लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आला. याआधी नॉर्थ कॅरोलिनामध्ये गेल्यावर्षी ट्रम्प २०२० नावाचं स्टीकर एका अस्वलाच्या शरीरावर चिटकवण्यात आलं होतं. आता ही घटना समोर आल्यावर पर्यावरण तज्ज्ञ यावर टीका करत आहेत.