Love Letter found: सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. पाश्चात्त्य पद्धतीनुसार, व्हॅलेंटाइन वीक हा प्रेमाचा आठवडा मानला जातो. या आठवड्याची आणि व्हॅलेंटाइन डे (Valentine's Day) ची अनेक प्रेमवीरांना वर्षभर प्रतीक्षा असते. या दिवशी प्रेमवीर आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला आपल्या भावना सांगतात, छानसा गुलाब, एखादी भेटवस्तू अन् प्रेमपत्रही देतात. पण एखाद्या प्रेमवीराच्या भावना प्रेमपत्रात अव्यक्तच राहिल्या तर... अशीच काहीशी घटना नुकतीच समोर आली आहे.
ट्विटरवर ओंकार खांडेकर नावाच्या युजरने प्रेमपत्राचा फोटो शेअर केला आहे. ते कोणी आणि कोणासाठी लिहिले हे कोणालाच माहीत नाही. नव्याने राहायला आलेले ओंकार यांना घर स्वच्छ करताना ते प्रेमपत्र सापडले.
जोडीदारासाठी लिहिलेले प्रेमपत्र द्यायचेच राहून गेले...
ट्विटरवर प्रेमपत्र शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, हे पत्र त्या व्यक्तीचे आहे, जो माझ्याआधी या रूममध्ये राहत होता. ओंकार यांनी मुद्दामच त्या व्यक्तीचे नाव सार्वजनिक केले नाही. गोपनीयतेच्या उद्देशाने पत्रात लिहिलेल्या व्यक्तीचे नाव त्यांनी लपवले. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, आज माझी खोली साफ करताना, माझ्या आधी या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीचे प्रेमपत्र सापडले. मी पूर्ण पत्र वाचले, त्यावरून असे समजले की ती व्यक्ती आपल्या जोडीदाराबद्दल आभार व्यक्त करत आहे.
ओंकार यांनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर इंटरनेटवर ही बाब पटकन व्हायरल झाली आणि त्याला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले की, 'हे अविश्वसनीय आहे. पत्र ज्या व्यक्तिसाठी लिहिले आहे त्या व्यक्तिपर्यंत ते पोहोचवणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. त्या प्रेमवीराला पत्र देता आले नसले, तरीही तुम्ही ते कार्य त्याच्यासाठी करा.' दुसऱ्या एका ट्विटर युजरने लिहिले की, 'अरे देवा, हा प्रकार तर 'सत्यजित रे' स्टाईल चित्रपटासारखा आहे. यावर नक्कीच चित्रपट बनवण्यात यायला हवा. तुम्ही यातला मजकूर सर्वांना नक्की सांगा.'