मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना संकटात वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा सामना सामान्य लोक करत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेले आणि विविध व्हिडीओद्वारे आपलं मत मांडणारे महिंद्रा इंडस्ट्रीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यामुळे ताडाचं झाड हलतानाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी एक प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला युजर्सही विनोदी आणि मजेदार पद्धतीने उत्तरही देत आहेत. या व्हिडीओत वेगवान वाऱ्यामुळे ताडाचे झाड जोरदार डुलक्या घेत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ज्यांनी काल मुंबईतील पावसाविषयी व्हिडीओ पाठवले त्यात हा व्हिडीओ सर्वांत नाट्यमय ठरला. हे ताडाचं झाड तांडव नृत्य करतंय? वादळाच्या नाटकाचा आनंद घेत आहे किंवा निसर्गाच्या क्रोधाचा नृत्य आहे की नाही हे आपल्याला शोधून काढावे लागेल असा त्यांनी प्रश्न केला.
हा व्हिडीओ एका घराच्या बाल्कनीतून शूट करण्यात आला आहे. ताडाचं उंच झाड वाऱ्यामध्ये डुलताना दिसत आहे. वेगवान वारे आणि पावसामुळे हे झाड प्रचंड आक्रमकपणे हलताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी याला रिट्विट केले आहे. जवळपास १ तासात ५५ हजारापेक्षा जास्त जणांना हा व्हिडीओ पाहिला होता. याला ११ हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि दीड हजारापर्यंत रिट्विट करण्यात आलं आहे.
काही जणांनी या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट केल्या आहेत. जर पृथ्वी एक घड्याळ असेल तर हे झाड बहुदा त्याचे काटे असते, वास्तव हे आहे की, हे झाड ना रागावलं आहे, ना आनंदी, फक्त भय आणि दहशत असावी. कोणी म्हणतं की हे दृश्य पाहून असं वाटतं की हे झाड आनंदात डौलत आहे. मुंबईच्या पावसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत त्यातील हा एक मजेशीर व्हिडीओ आहे.