नवी दिल्ली – अलीकडेच केरळमधील गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेलं अन्न दिल्यानं तिचा मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला. मुक्या जनावराला असं निर्दयीपणे मारल्याने माणुसकीवर शंका उपस्थित झाली. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. मात्र सध्या सोशल मीडियात असा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल.
हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड वेगात व्हायरल होत आहे. या एका हत्तीचं पिल्लू जन्मानंतर २० मिनिटांमध्ये जमिनीवर उभं राहून डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओ आपण पाहू शकता की, यात हत्तीणी पुढे चालत आहे तर मागे हत्तीणीचं पिल्लू डान्स करत आहे.
सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, हे हत्तीचं पिल्लू २० मिनिटांपूर्वी जन्मलेलं आहे. या नव्या जगात आल्याबद्दल तो किती आनंदी झाला आहे हे डान्स करताना दिसून येतं. या पायांनी आता त्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो जणांनी या व्हिडीओला लाईक्स केला आहे.
काही दिवसांपूर्वी केरळमधील मलप्पुरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. अननस खाल्यानंतर हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्या मुलासह तिचा मृत्यू झाला. सदर घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. हत्तीणीच्या मृत्यूबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी देशभरातील लोकांनी केवळ शोक व्यक्त केला नाही, तर आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी दबावही टाकण्यात आला. यानंतर याप्रकरणी केरळ पोलिसांनी एका आरोपीस अटक केल्याची माहिती केरळचे वनमंत्री के. राजू यांनी दिली. तर, आणखी संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.