बंगळुरूमधील वाहतुकीची स्थिती सर्वांनाच माहीत आहे. ट्रॅफिकसाठी हे शहर नेहमीच चर्चेत असतं. अशीच एक अशी घटना आता समोर आली आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुंदररित्या सजलेली नववधू मेट्रोने प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ट्रॅफिकमध्ये अडकू नये यासाठी एका कुटुंबाने शक्कल लढवली. लग्नाच्या ठिकाणी कारने न जाता त्यांनी मेट्रोने जाण्याचा निर्णय घेतला. 'पीक बंगळुरू मोमेंट'चा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि मॅच मेकिंग साइट भारत मॅट्रिमोनीने त्याला 'मेट्रोवाले दुल्हनिया ले जायेंगे' असं म्हटलं आहे.
व्हिडिओमध्ये, नवरी आपल्या कुटुंबासह मेट्रोच्या गेटमधून बाहेर पडताना प्लॅटफॉर्मवर आणि मेट्रोमध्ये फोटो काढताना दिसत आहे. या घटनेनंतर शहरातील वाहतूक समस्येवरील चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. ट्विटरवर फॉरएव्हर बंगलुरु नावाच्या हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिलं की, देव जोडप्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देवो. अधिकारी याकडे लक्ष देतील अशी आशा आहे. तर दुसऱ्याने धन्यवाद मेट्रो. मेट्रो नसती तर काय झालं असतं? असं म्हटलं आहे.