एखाद्या गोष्टीची आवड आणि ती पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असली तर काहीही शक्य होतं. अनेकांना दुसऱ्या देशांची संस्कृती, कला शिकण्याची आवड असते. अशीच एक गायिका आहे, जी आपल्या आवडीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर गझल गायकी शिकली. या गायिकेचं नाव तान्या वेल्स आहे.
तान्याचा गेल्या काही दिवसांपासूनच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तान्या 'आज जाने कि जिद ना करो' ही लोकप्रिय गझल गाताना दिसत आहे. तान्या ही मुळची ब्रिटनची आहे. पण तिची गझल गायकी ऐकून कुणीही म्हणणार नाही की, ती एक ब्रिटीश महिला आहे.
फय्याज हाशमी यांनी लिहिलेली गझल चांगलीच प्रसिद्ध असून आतापर्यंत अनेक दिग्गज गायकांनी ही गझल आपल्या आवाजात गायली आहे. पण या गझलला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली ती फरीदा खानम यांच्या आवाजात. आता पुन्हा एकदा या गझलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तान्या वेल्सने ही गझल पाकिस्तानच्या लाहोरमधील एका कार्यक्रमात गायली होती. हा कार्यक्रम गेल्यावर्षी झाला होता. तान्याने आपल्या आवाजाच्या जादूने हॉलमधील श्रोत्यांवर एकप्रकारे मोहिनीच घातली होती.