मुंबई : मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या क्लीनअप मार्शलला एका कार चालकाने चक्क कारच्या बोनेटवरून चक्क फरपटत नेल्याचा प्रकार एका व्हायरल व्हिडिओतून समोर आला आहे. (Video emerges from Mumbai showing a BMC Marshal being dragged by a car he tried to stop because the driver was not wearing a mask)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाऱ्यांवर मुंबईत क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. याबाबत पश्चिम द्रुतगती महामार्गावर कारवाई सुरू होती. यावेळी मास्क न घातल्याने कार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न क्लीनअप मार्शल सुरेश करत होते. यादरम्यान, एका कार चालकाला कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्लीनअप मार्शल सुरेश यांनी थांबविले आणि २०० रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, यावेळी चक्क कारवाईपासून वाचण्यासाठी या क्लीनअप मार्शल सुरेश यांना कारच्या बोनेटवरून फरपटत नेले.
यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुरेश यांनी टी-शर्ट, जीन्स आणि कॅप घातली होती. बोनेटवर सुरेश यांनी एका हाताने वाइपर धरला आहे. तर दुसऱ्या हातात वही दिसत आहे. दरम्यान, ही घटना 2 सप्टेंबरची आहे. पण पाच दिवसांनंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे, कारण व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने शेअर केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालक फरार आहे.