U19 World Cup, 4 Balls 4 Wickets Video: महिला अंडर-19 विश्वचषक 2023 दक्षिण आफ्रिकेत होत आहे. अनेक युवा गोलंदाज आणि फलंदाज या स्पर्धेत आपली चमकदार करून लक्ष वेधत आहेत. पण आज एका फारशा ओळखीच्या नसलेल्या महिला खेळाडूने थेट श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगासारखा चमत्कार करून दाखवला. रवांडाची वेगवान गोलंदाज हेन्रिएट इशिमवे (Henriette Ishimwe) हिने स्पर्धेतील १४व्या सामन्यात ४ चेंडूत ४ फलंदाजांना माघारी धाडले. या सामन्यात रवांडाचा सामना झिम्बाब्वेशी झाला. त्याच्या गोलंदाजीमुळे रवांडाने हा सामना ३९ धावांच्या फरकाने जिंकला.
१९व्या षटकात अप्रतिम कामगिरी
झिम्बाब्वेच्या डावातील १९व्या षटकात हेन्रिएट इशिमवे गोलंदाजीला आली. तिने पहिल्याच चेंडूवर कुडजाई चिगोराला बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. पुढच्या चेंडूवर ओलिंडाही धाव न घेता धावचीत झाली. १०व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चिपो मोयोलाही हेन्रिएट इशिमवेने बोल्ड केले आणि हॅटट्रिक घेतली. त्यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर हेन्रिएटने आस्था एनडलांबीला बाद करून झिम्बाब्वेचा डाव ८० धावांत गुंडाळला. पाहा व्हिडीओ-
१८व्या षटकातील पाचव्या चेंडूवरही झिम्बाब्वेला धक्का बसला होता. अशाप्रकारे संघाने शेवटच्या ६ चेंडूत शेवटच्या ५ विकेट्स गमावल्या. या दरम्यान त्यांच्या फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना रवांडाच्या संघाने ११९ धावा केल्या होत्या. रवांडानेही शेवटच्या ४ विकेट्स ७ चेंडूत गमावल्या होत्या. पण झिम्बाब्वेचा डाव ८० धावांत आटोपल्याने रवांडाने ३९ धावांनी विजय मिळवला. या संघाचा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार वेळा घडला असा पराक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार गोलंदाजांनी सलग चार चेंडूंत चार विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने दोनदा अशी कामगिरी केली आहे. एकदा एकदिवसीय आणि एकदा टी२० मध्ये त्याने असे केले आहे. याशिवाय आयर्लंडचा कर्टिस कॅम्फरने एकदा, अफगाणिस्तानचा रशीद खान याने एकदा आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर यांनी एकदा ही कामगिरी केली आहे. या महिला अंडर-19 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या मॅडिसन लँडसमॅनने हॅटट्रिक घेतली होती. पण आज डबल हॅटट्रिक घेत रवांडाच्या हेन्रिएट इशिमवेने इतिहास रचला.