रेल्वेतील फोन चोरीच्या घटनांशी संबंधित अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. त्यात आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. मात्र ही घटना कधी आणि कुठे घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की, एक लहान मुलगी ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसून फोन वापरत असताना बाहेरून एका व्यक्तीने तिच्या हातातील फोन हिसकावला.
मुलगी फोनमध्ये पाहण्यात व्यस्त असताना ट्रेनच्या बाहेर असलेल्या एका व्यक्तीने मुलीच्या हातातील फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीला मदत करण्याऐवजी कोचमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीने ही संपूर्ण घटना फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलगी सतत ओरडत राहिली पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही.
११ सेकंदाचा ट्रेनमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मुली ट्रेनच्या विंडो सीटवर बसलेल्या दिसत आहेत. पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली मुलगी आरामात फोन पाहत आहे. त्याचवेळी बाहेरून एक व्यक्ती तिच्या हातातून फोन हिसकावून घेते.
मुलगी विरोध करते. ती जोरात ओरडते - माझा फोन सोडा... चोर फोन तिच्या हातातून हिसकावून पळून जातो. त्यानंतर ती ट्रेनमधील इतर प्रवाशांना आपला फोन हिसकावल्याचं सांगते. या घटनेदरम्यान एक व्यक्ती व्हिडीओ बनवत राहतो आणि चोरी थांबवण्यासाठी कोणतंही पाऊल उचलत नाही. तसेच इतर कोणीही मुलीच्या मदतीला धावून येत नाही. यामुळेच काही लोक या व्हिडीओला स्क्रिप्टेड व्हिडीओ देखील म्हणत आहेत.