बीजिंग : चीनमधील एका व्यक्तीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय देणाऱ्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते आहे की चिमुकल्या मुलीसाठी एक तरूण देवदूत बनला आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडलेल्या लहान बाळाचा अचूक झेल घेऊन व्यक्तीने त्याला जीवनदान दिले आहे. खर तर ही लहान मुलगी पाचव्या मजल्यावरील खिडकीला लटकत असताना ही घटना घडली.
दरम्यान, चीनमधील झेजियांग प्रांतातील तोंगजियांग मधील या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आपल्यातील हिरो असा उल्लेख करत त्यांनी झेल घेणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक लहान मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीला लटकत आहे. मुलीला पाहताच तेथील एका व्यक्तीने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि ती खाली पडताच तिचा अचूक झेल घेतला. ती संबंधित व्यक्ती योग्य वेळीच पोहचली नसती तर काय झाले असते याची कल्पना देखील करणे कठीण आहे.
शेन डोंगने जिंकली अनेकांची मने साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार, मुलीचा जीव वाचवणारी व्यक्ती ३१ वर्षीय असून त्याचे नाव शेन डोंग असे आहे. त्याने सांगितले की, त्याला जेव्हा पहिल्या मजल्यावरील छताच्या बाजूला असलेल्या पत्र्याचा आवाज ऐकू आला तेव्हा तो सतर्क झाला आणि मुलीचा झेल घेतला. २ वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवला असून मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली आली होती अशी अधिक माहिती त्याने दिली. घटनेनंतर मुलीला इस्पितळात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, मुलीच्या पायांना आणि फुफ्फुसांमध्ये दुखापत झाली आहे मात्र तिची प्रकृती स्थिर आहे.