नवी दिल्ली - आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला असं काहीतरी करायचं असतं जे पाहून इतरांना आणि त्याच्या कुटुंबातील लोकांना आपला अभिमान वाटेल. यासाठी अनेकदा खूप मेहनत देखील घेतली जाते. कोणतंही काम कधीच लहान किंवा मोठं नसतं. माणसाचे विचार हे छोटे मोठे असतात. केरळमधील गिरी आणि तारा यांची गोष्ट सध्या लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या कपलला लोकांना सुंदर आणि आनंददायी बस राईड करायला आवडतं आणि आज या छंदामुळे त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (Kerala State Road Transport Corporation) बस हे कपल चालवतात. या बसमध्ये दोघेही एकत्र आहेत. नवरा गिरी ड्रायव्हर तर पत्नी तारा कंडक्टर म्हणून काम करते. हे जोडपे अलप्पुझा जिल्ह्यात खूप प्रसिद्ध झाले आहे. हे दोघेही प्रेमाने बस चालवतात त्यामुळे लोकांना या बसने प्रवास करायला खूप आवडतं. या जोडप्याची गोष्ट फेसबुकवर व्हायरल होत आहे. Iype Vallikadan नावाच्या युजरने बस आणि या कपलशी संबंधित एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. लाखो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे.
इतकंच नाही तर ही बस इतर बसपेक्षा खूप वेगळी आहे, कारण यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेपासून ते त्यांच्या मनोरंजनापर्यंतची काळजी घेतली जाते. बसमध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. इमर्जन्सीसाठी स्विच देखील आहेत. मनोरंजनासाठी म्युझिक सिस्टम आणि ऑटोमेटीक एअर फ्रेशनर बसवण्यात आले आहेत. लोकांना स्थानकाची माहिती देण्यासाठी एलईडी डेस्टिनेशन बोर्डही लावण्यात आला आहे.
गिरी आणि तारा यांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून बस इतकी सुंदर बनवली आहे. त्यांच्या बसमधून काही लोकांना दररोज प्रवास करायला आवडतो. सकाळी 5.50 वाजता बससेवा सुरू होते. तारा आणि गिरी यांची भेट 20-22 वर्षांपूर्वी झाली होती, जेव्हा गिरी 26 वर्षांची आणि तारा 24 वर्षांची होती. कुटुंबातील सदस्य त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते, त्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर जवळपास 20 वर्षांनी लॉकडाऊनमध्ये त्यांनी लग्न केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.