सकाळी घाईघाईत उबर बुक करून ऑफिसला निघालात आणि जर कोट्यवधींचं बिल आलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. अशीच एक घटना आता समोर आली आहे. दीपक तेनगुरिया नावाच्या व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला. या व्यक्तीने उबरच्या माध्यमातून स्वत:साठी एक ऑटो बुक केली होती, ज्याचं भाडे सुरुवातीला 62 रुपये दाखवण्यात आलं होतं. मात्र प्रवास संपल्यावर भलतंच बिल समोर आलं आहे.
कंपनीने ग्राहकांला तब्बल 7,66,83,762 रुपयांचं बिल पाठवलं. बिलमध्ये वेटिंग टाईम आणि दुसरे डिटेल्स देण्यात आले आहेत. कंपनीने 1,67,74,647 रुपये भाडं आकारलं आहे, तर वेटिंग टाईमसाठी 5,99,09,189 रुपये आकारण्यात आले आहे. यासोबतच कंपनीने बिलावर 75 रुपयांची सवलत दिली आहे, जी प्रमोशनल आहे. म्हणजेच या प्रवासासाठी ग्राहकाला 7.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे.
दीपक तेनगुरिया यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांच्यासोबत घडलेला प्रकार व्हिडीओ शेअर करून सांगितला आहे. त्यांनी आपल्या प्रवासाची माहिती दिली. दीपक यांच्या या पोस्टला कंपनीने उत्तर दिलं आहे. कंपनीच्या सपोर्ट बॉटने लिहिले आहे की, "या घटनेबाबत समजल्यावर आम्हाला दु:ख होत आहे."
"आम्हाला थोडा वेळ द्यावा, जेणेकरून आम्ही या समस्येची चौकशी करू शकू. आम्ही तुम्हाला लवकरच अपडेट करू" उबरने एवढं मोठं बिल पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. असंच काहीसं गेल्या वर्षी एका जोडप्यासोबत घडलं होतं. जेव्हा त्यांच्या प्रवासाचं बिल 55 डॉलर असताना 29,994 डॉलर आलं.