विमानाने प्रवास करणाऱ्यांना सोबत लगेज घेऊन जाण्याला वजनाची एक सीमा असते. जेवढं जास्त लगेजचं वजन असेल तेवढे जास्त पैसे त्यांना भरावे लागतील. पण लोक काहीना काही जुगाड शोधतातच. ग्लासगोमध्ये राहणाऱ्या जॉन इरविन या व्यक्तीने असाच एक भन्नाट जुगाड केला.
जॉन फ्रान्सच्या नाइस एअरपोर्टवर परिवारासोबत गेले होते. त्यांना सांगितलं गेलं की, बॅग जास्त जड आहे. त्यामुळे जास्त पैसे भरावे लागतील. जॉनने पैसे वाचवण्यासाठी बॅगमधील १५ शर्ट एकावर एक अंगावर घातले आणि जास्त द्यावे लागणारे पैसे वाचवले.
जॉनचा हा शर्ट घालतानाचा एअरपोर्टवरील व्हिडीओ ट्विटवर शेअर करण्यात आला आहे. नाइस परिवारातील लोक एडिनबर्गला जात होते. एअरपोर्टवर आलेल्या अडचणीला त्यांनी अशाप्रकारे सोडवलं.
याआधीही अशा घटना
अशी घटना पहिल्यांदाच घडली असे नाही तर याआधीही प्रवाशांनी पैसे वाचवण्यासाठी अशाप्रकारे एकावर एक कपडे घातले. एप्रिलमध्ये अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी नताली व्यानने फ्लाइटमध्ये सात ड्रेस, दोन जोडी शूज, दोन जोडी शर्ट्स, एक स्कर्ट आणि एक कार्डगन घातलं होतं. हे सगळं करून तिने साधारण ६ हजार ५०० रूपये वाचवले होते.