नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने बंद होती. त्यामुळे कोरोना संकट काळात अनके खवय्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता देशातील अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने सुरु होत आहेत. त्यामुळे आता लोक कोरोनाला विसरून त्यांच्या आवडत्या डिशचा स्वाद घेण्यासाठी दुकानांमधून गर्दी करताना दिसत आहे.
असाच काहीसा प्रकार बंगळुरूमधील एका प्रसिद्ध बिर्याणी दुकानासमोर घडला आहे. याठिकाणी लोक बिर्याणी खाण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमले की रस्त्यावर जवळपास दीड किलोमीटर लांब इतकी रांग लागली होती. बंगळुरूमधील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स या व्हिडिओला लाईक करत आहेत. तर काहींनी असेही विचारले की, बिर्याणी मोफत वाटत आहेत का?, तर हा व्हिडीओ बंगळुरूमधील होसकोटेचे प्रमुख आनंद दम बिर्याणी यांच्या दुकानासमोरील आहे.
लोकांना या दुकानातील बिर्याणी इतकी आवडते की, ते यासाठी दुकानात मोठ्या संख्येने पोहोचतात. तसेच, येथील बिर्याणीचा स्वाद घेण्यासाठी लोक दूरवरून येतात. रविवारी हे दुकान सुरू झाल्याची माहिती लोकांना समजताच ते दुकानात बिर्याणी खाण्यासाठी जमले. रस्ता पाहिल्यावर जवळपास दीड किलोमीटरची रांग लागली होती. दरम्यान, कोरोना संकट काळात रस्त्यावर अशी गर्दी पाहून लोक आश्चर्यचकित झाले. मात्र, खबरदारी म्हणून प्रत्येकाने मास्क लावल्याचे दिसून आले.
याचबरोबर, बिर्याणीच्या या दुकानात इतकी लांब रांग पाहिल्यानंतर दुकानदाराच्या कमाईचा अंदाज लावण्यात आला. यावेळी असे दिसून आले की या दुकानाने पूर्वीच्या तुलनेत २० टक्के अधिक कमाई केली आहे. हे दुकान बंगळुरु सिटी सेंटरपासून जवळपास २५ किमी अंतरावर आहे. या दुकानात आता बिर्याणी खरेदी करण्यासाठी दीड तास लागतो, असे सांगितले जाते.