Viral Video : तंत्रज्ञानामुळे आपली कामे सोपी झाली आहेत, पण त्याचा वापर चुकीच्या कामासाठी केला तर चुकीची घटनाही घडू शकते. एका व्हायरल व्हिडीओबाबत यूजर्स अशाच प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती Advanced Driver Assistance System (ADAS) मोडमध्ये Mahindra XUV700 चालवत आहे. विशेष म्हणजे, याचा वापर तो चक्क रील बनवण्यासाठी करतोय. त्याच्यासोबत एक महिला आणि लहान मुलही आहे. या कृतीमुळे यूजर्स त्याच्यावर टीका करत आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
अपघात कमी करण्यासाठी ड्रायव्हरला मदत करणे हे ADAS चे मूळ कार्य आहे, परंतु व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती या तंत्रज्ञानाचा गैरवापर करत असल्याचे दिसत आहे. महिंद्रा XUV700 ला ADAS मोडमध्ये ठेवून तो त्या महिलेसोबत रील बनवत आहे. यावेळी ड्रायव्हिंग सीटवर बसलेला तो आपली दोन्ही पाय बाजुच्या सीटवर बसलेल्या महिलेच्या मांडीवर तर कधी सीटवर ठेवतो. विशेष म्हणजे, त्याचे लक्ष रस्त्याकडे अजिबात नाहीये.
मागच्या सीटवर बसलेला एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ बनवत आहे. या वेळी कार महामार्गावर वेगाने धावतानाही दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत 'सुरिली आंखियो वाले...' हे गाणं वाजत आहे. हा व्हिडिओ गेल्या आठवड्यात अफसर घुडासी (afsar_ghudasi44) नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. हा सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यावर सुंदरदीप नावाच्या एका ट्विटर युजरने म्हटले- भारतात अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल व्यतिरिक्त ADAS चे इतर फीचर्स जोक बनले आहेत. तर, सुमित लिहितो- या रील जीव घेतील. अमित म्हणाला - चालकावर कारवाई झाली पाहिजे. तंत्रज्ञानाचा पूर्णपणे चुकीचा वापर.
ADAS प्रणाली म्हणजे काय?अपघात कमी करण्याच्या उद्देशाने ADAS (Advanced Driver Assistance System) फीचर सादर करण्यात आले. हे रडार आधारित तंत्रज्ञान आहे. परिस्थितीनुसार, हे फीचर आपोआप कार नियंत्रित करते, ज्यामुळे अपघात टाळता येतो. हे फीचर महिंद्रा XUV 700 मध्ये आहे. ADAS फीचर भारतीय रस्त्यांवर कितपत यशस्वी ठरेल, हे येणाऱ्या काळातच कळेल.