एअर इंडियाचे कर्मचारी प्रवाशांच्या सामानाचे नुकसान होईल अशा स्थितीत वाहतूक करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रवाशांचे किमती सामान विमानाच्या लगेज कार्टमध्ये ठेवले जात आहे. पण, ज्याप्रकारे या सामानाची वाहतूक सुरू आहे हे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ जाधवने यावरून नाराजी व्यक्त केली होती.
एअर इंडियाचे कर्मचारी घाईघाईत सामानाची वाहतूक करत असून, नुकसान होऊ नये याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक कर्मचारी गिटारसारख्या नाजूक वस्तू फेकत आहेत.
इंस्टाग्रामवर ईश्वर द्विवेदी नावाच्या व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने एअर इंडिया एअरलाइन आणि त्याचे मालक रतन टाटा यांना देखील टॅग केले आहे. अनेक युजर्संनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. "नाजूक वस्तूंची काळजी घेण्याची ही पद्धत आहे का?, कर्मचाऱ्यांना एवढी कसली घाई असते?, अशा पद्धतीने गायन साहित्याची काळजी घ्यायला पाहिजे, अशा मिश्किल प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. तो मुंबईहून गोव्याला जात होता. लँडिंग झाल्यानंतर त्याने त्याच्या बॅगेचा व्हिडीओ शेअर केला होता, जी तुटलेल्या अवस्थेत दिसत होती. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे बॅगेची वाहतूक केली त्यावरून सिद्धार्थने संताप व्यक्त केला.