एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अन् कधीकाळचा एक रिक्षावाला महाराष्ट्राचा प्रमुख झाला, याचा आनंद रिक्षावाल्यांनी साजरा केला. शिंदेंच्या ठाण्यात रिक्षावाल्यांनी रॅली काढून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. मात्र, नेहमीच आपल्या वादग्रस्त शैलीमुळे चर्चेत असलेल्या रिक्षावाल्यांचे अनेकदा व्हिडिओ व्हायरल होतात. आता, पुन्हा एकदा एका रिक्षावाल्याचा भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. चक्क पादचारी पुलावरुन या रिक्षाचालकाने आपली रिक्षा घेऊन मार्गक्रमण केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, ट्विटरवर काहींना हा व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिदें भाजपाकडे याच गेले, असे म्हटले आहे. या व्हिडिओवरुन काही मिम्सही बनले आहेत.
सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. पालघरच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन क्रॉस करण्यासाठी रिक्षाचालकाने चक्क पादचारी पुलाचा वापर केल्याचा हा व्हिडिओ आहे. पादचारी पुलावरून चाललेला रिक्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यावर अनेक कमेंट आणि लाईक्सचा तर पाऊसच पडतोय. पालघर जिल्ह्यातील भारोल या गावाच्या परिसरात हा पादचारी पुल आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग ओलांडण्यासाठी रिक्षाचालकाने चक्क पब्लिक ब्रिजचाच वापर केला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे पालघर मार्गेच सुरतला गेले होते, त्यामुळे अनेकांनी त्याच्याशी या रिक्षावाल्याचं कनेक्शन मजेशीर जोडलं आहे
आमदार मिटकरींनीही शेअर केला व्हिडिओ
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर या रिक्षाचालकाच्या ब्रिजवरील व्हिडीओला आजच्या राजकारणाचासंबंध जोडून तो सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडीओचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. असल्यास केवळ योगायोग समजावा, असं आमदार मिटकरी यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.