सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक कमाल व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहेत. उत्तर प्रदेशच्या झाशी येथे एका पिटबुलने किंग कोब्राशी झुंज देऊन बागेत खेळणाऱ्या मुलांचा जीव वाचवला आहे. मुलं बागेत खेळत होती. त्याच दरम्यान तिथे एक कोब्रा होता. पिटबुलने ते पाहताच त्याने दोरी तोडली आणि धावत जाऊन त्याच्यावर हल्ला केला. त्याला आपटून आपटून मारलं.
मिळालेल्या माहितीनुसार, झाशी जिल्ह्यातील शिव गणेश कॉलनीत ही घटना घडली. माजी ब्लॉक प्रमुख पंजाब सिंह हे आपल्या कुटुंबासह तेथे राहतात. त्यांच्याकडे पिटबुलसह इतर अनेक श्वान आहेत. काही कामानिमित्त ते घराबाहेर गेले होते. घरात त्यांचा मुलगा, नोकर व लहान मुलं होती. संध्याकाळी कोब्रा घरात घुसला आणि तिथे खेळणाऱ्या मुलांकडे जाऊ लागला. याच दरम्यान, मुलांनी त्याला पाहिलं आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली.
घरात असलेल्या जिनी नावाच्या पिटबुलला बागेत खेळणाऱ्या लहान मुलांचा आवाज ऐकू आला. त्याला दोरीने बांधून ठेवलं होतं. पण जेव्हा गोंधळ वाढला तेव्हा पिटबुलने दोरी तोडली आणि मुलांजवळ पोहचला. त्याने कोब्राला आपल्या दातांनी पकडून एका बाजूला नेलं. त्याच्याशी काही वेळ झुंज दिली आणि लहान मुलांचा जीव वाचवला. हा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पंजाब सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पिटबुलने आतापर्यंत जवळपास ८ ते १० सापांपासून त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव वाचवला आहे. आमचं घर शेतात असल्याने पावसाळ्यात अनेक प्रकारचे साप येत असतात. आजच्या काळात लोक प्राण्यांपासून दूर जात आहेत. पण प्राणी अशाप्रकारे माणसांचा जीव वाचवतात असंही पंजाब सिंह यांनी म्हटलं आहे.