विमानात घडत असलेल्या विचित्र घटना सतत समोर येत असतात. कधी कुणाची मारामारी, तर कधी कुणी एमरजन्सी दरवाजा उघडतात. अशीच एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. शुक्रवारी मॉन्ट्रियल टूड्रोमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर कॅनडा एक्सप्रेसच्या ८८४ विमानाने उड्डाण घेतलं. पण काही सेकंदातच विमानाचं मुख्य लॅंडींग गिअरचं चाक निघालं. ही धक्कादायक घटना एका प्रवाशाने कॅमेरात कैद केली.
ज्या प्रवाशाने हा व्हिडीओ काढला त्याने लगेच पायलटला याची माहिती दिली. त्यानंतर पायलटने लगेच विमानाचं सुरक्षित लॅंडींग केलं. या विमानात ४९ प्रवासी होते. हा व्हिडीओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला असून त्याने लिहिले की, 'सध्या एका विमानातून प्रवास करत आहे, ज्याचं चाक निघालं. २०२० ची चांगली सुरूवात'.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवासी व्हिडीओ काढत असताना त्याला दिसले की, चाकाच्या ठिकाणी आग लागली आणि काही सेकंदातच चाक वेगळं झालं. याबाबत जेज एव्हिएशनचे प्रवक्ता मेनन स्टुअर्ट यांनी सांगितले की, 'विमानाचा पायलट चांगलाच अनुभवी होता. त्याने लगेच स्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि विमानाचं सुरक्षित लॅंडींग केलं. पायलटच्या समजदारीमुळे ४९ प्रवाशांचा जीव वाचला. कदाचित या प्रवाशाने व्हिडीओ काढला नसता तर कुणाला काही कळालंही नसतं.