मुंबई - दिवाळी हा आनंदाचा आणि दिव्यांनी प्रकाशमान होण्याचा सण. घरोघरी मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली जाते. गरीबाच्या झोपडीपासून ते गर्भश्रीमंतांच्या घरातही दिवे, लायटींग पाहायला मिळते. दिवाळी फराळ आणि गोडधोड पदार्थांची चव चाखायला मिळते. जुन्या मित्र-मैत्रीणींची मैफील जमत असते. एकंदरीत सगळीकडे उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. भाऊबीजेला बहिण भावाच्या प्रेमाची ओवाळणी पाहायला मिळते. बहिणीच्या रक्षणाचे वचन भाऊ देतो, तर बहिणी भावाच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करते. याच भाऊबीजेच्या ओवाळणीचा एक सुंदर व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. चिमुकल्या बहिण-भावाजी ही भाऊबीज नेटीझन्सला भावून गेली. निरागस बहिणीने विचारलेल्या प्रश्नावर सगळेच हसू लागले.
दिवाळीत प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करतो. अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरी करत प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व या सणाला आहे. भाऊबीजेला घरोघरी बहिणी भावाच्या ओवाळणीची आणि प्रेमाच्या नात्याची महती दिसून येते. चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत बहिण-भावाचं हे नातं दिवाळीतील प्रेमानं आणखी उजळून निघतं. सध्या सोशल मीडिया असल्याने चिमकुल्या बहिणी भावांचे रक्षाबंधन आणि भाऊबीजेचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अबोली-कस्तुरी या फेसबुक युजर्संने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या चांगलाचा व्हायरल होत आहे.
आपल्या भावाला ओवाळणाऱ्या चिमुकल्या पोरीच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत आहे. तर, ओवाळणीवेळी मुलीची आई भाऊबीजेचं लोकप्रिय मराठी गीत... ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया... म्हणत असल्याचंही दिसून येतं. त्याचवेळी, वेड्या बहिणीची वेडी माया... हे शब्द ऐकताच हाती ओवाळणीचं ताट घेतलेली चिमुकली रागावून तिच्या आईकडे पाहते आणि म्हणते... मला तू वेडी बोलतेयस... त्यावेळी एकच हशा पिकतो. चिमुकल्या मुलीचे हावभाव आणि प्रश्न विचारतानाची नजर पाहून व्हिडिओ पाहणाऱ्यांना हसू आवरणार नाही.